मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 03:58 PM2023-07-28T15:58:37+5:302023-07-28T15:59:18+5:30
Nana Patole Criticize Central Government: मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे.
मुंबई - मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. टीव्हीवर पेपरमध्ये आपला फोटा कसा येईल याचीच त्यांना जास्त चिंता असते. मणिपूरमधील महिला अत्याचाराची चौकशी सीबीआय करणार असल्याचे समजते पण सीबीआय चौकशीतून काय होणार ? सीबीआय पुलवामा घटनेचीही चौकशी करत आहे, त्याचा अद्याप अहवाल आला का ? या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, त्यांचे काम कसे चालते हे सर्वांना माहित आहे, अशी टीका नाना पटोले यांवी लगावला आहे.
मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीबीआयने हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सीबीआय सामुहिक अत्याचार प्रकरणी नवी एफआयआर दाखल करणार आहे.
मणिपूरमध्ये ८६ दिवसांपासून हिंसाचार होत आहे. यादरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले की, आम्ही मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सुनावणी पूर्ण करण्यासाठी सुप्रिम कोर्टाकडून प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याची विनंती केली आहे.