MSBSHSE CBSE syllabus: राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२५-२०२६ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (२० मार्च) विधान परिषदेमध्ये दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला होता. राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
कधीपासून लागू होणार?
राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने मान्यता दिली आहे, असे दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितले. सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. १ एप्रिलापासून सत्राची सुरूवात करण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडूनही सूचना
दादा भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी १०० दिवसांच्या कामांचा अजेंडा देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यात आला होता. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.