मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरारपर्यंतच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मात्र विरारपुढील स्थानके सीसीटीव्हीपासून उपेक्षितच राहिली होती. पण आता विरारपुढील जवळपास १५ स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने आपल्या ताफ्यात बॅगेज स्कॅनर मशिन आणि डॉग्ज स्क्वॉडही आणले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रवाशांच्या त्याचबरोबर संशयितांच्या हालचाली टिपण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसवले जात आहेत. यात इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम अंतर्गतही महत्त्वाच्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. सध्या चर्चगेट ते विरारपर्यंतच्या सर्व स्थानकांवर जवळपास १ हजार ९0 सीसीटीव्ही असून, यात विरारपुढील स्थानके मात्र अजूनही उपेक्षितच आहेत. आता विरार ते डहाणूबरोबरच डहाणूपुढीलही महत्त्वाच्या अशा एकूण १५ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. ‘निर्भया निधी’तून प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यात येतील. यात प्रत्येक स्थानकासाठी जवळपास ५0 लाख खर्च येणार असल्याचे झा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>टपोरींविरोधात मोहीमआरपीएफकडून १ ते १५ जुलैपर्यंत लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जाणार आहे. टपावरून प्रवास करणारे प्रवासी आढळल्यास त्याचा फोटो किंवा शूटिंग करून रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे किंवा त्याची माहिती स्थानकातील आरपीएफला द्यावी.
विरारपुढील १५ स्थानकांवर सीसीटीव्ही
By admin | Published: July 02, 2016 5:09 AM