मुंबई : राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी निर्मनुष्य सागरी किनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेसंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपसभापती वसंत डावखरे, गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार हुस्नबानो खिलफे, आ. जोगेंद्र कवाडे, भाई गिरकर, गृह विभागाचे सचिव रजनीश शेठ, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. सागरी सुरक्षेसंदर्भात आमदार हुस्रबानो खलिफे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विधानपरिषद सभापतींनी यासंदर्भात बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. रश्मी शुक्ला यांनी यावेळी सागरी सुरक्षेसंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.यावेळी खलिफे यांनी सागरी किनाऱ्यावर बेकायदा वस्ती करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)
सागरी किनाऱ्यावर सीसीटीव्ही
By admin | Published: February 24, 2016 1:05 AM