ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीसवरील रेल्वे तिकीटघर परिसरात एका तोतया टीसीने बदलापूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिल्यावर त्या पिडीत मुलीच्या पालकांनी त्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर काही महिन्यांनी का होईना तेथे रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. त्यामुळे त्या पित्याने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या या रेल्वे स्थानकात दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. या परिसरात रेल्वेने ९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ते सर्व कॅमेरे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, सॅटीसवर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने जून महिन्यात बदलापूर येथे राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा तोतया टीसी पसार होण्यात यशस्वी ठरला. या घटनेनंतर येथून जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला. याचदरम्यान, पिडीत तरुणींच्या पालकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत रेल्वे आणि ठामपा प्रशासनाकडे विचारणा केल्यावर दोघांनी जबाबदारी झटकली. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. हे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही बसविण्याबाबत हालचाली सुरू केल्या. सॅटीसवरील तिकीट घराजवळ नुकताच सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. (प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसांच्या प्रयत्नांमध्ये प्रचंड ताकद आहे. प्रत्येकाला त्याची जाणीव होणे गरजेचे आहे. आजच्या काळात माणून म्हणून जगायचे असेल, तर तशी जाणीव यंत्रणांना होणे गरजेचे आहे. माझी मुलगी बचावली. पण तेवढ्यावर मी गप्प राहिलो नाही. मी प्रयत्न केले आणि यशस्वी झालो. - पिडित मुलीचे वडील
सॅटीसवरील तिकीटघराजवळ अखेर सीसीटीव्ही
By admin | Published: September 19, 2016 3:26 AM