मुंबई : लांब पल्ल्याच्या किंवा लोकलच्या डब्यांमधील तांत्रिक बिघाड वेळीच ओळखून त्याद्वारे संभाव्य अपघात टाळणे आता हायस्पीड सीसीटीव्हीद्वारे शक्य होईल. याचा पहिला प्रयोग वसई रोड स्थानकात करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.भारतीय रेल्वेने शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच दृष्टीकोनातून पश्चिम रेल्वेमार्गावार धावणाऱ्या ट्रेनच्या डब्यांतील तांत्रिक बिघाड शोधणारे सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वेस्थानकात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानकात आलेल्या आणि तेथून जाणाऱ्या कोणत्याही ट्रेनच्या डब्यात कुठलीही तांत्रिक समस्या उद्भवल्यास ती सीसीटीव्हीमधील सेंसरद्वारे ओळखली जाईल आणि त्याची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला देऊन अपघात टाळता येईल. विशेष म्हणजे, ट्रेन कितीही वेगात असली तरी या कॅमेऱ्यांची क्षमता एवढी आहे की तत्काळ कॅमेरा झूम (दृश्यबदल), रिव्हर्स आणि प्ले करून डब्यातील तांत्रिक समस्या टिपता येईल. (प्रतिनिधी)हायस्पीड कॅमेरे रुळांच्या बाजूलाच असणाऱ्या खांबांवर बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांचा प्रयोग वसई रोड स्थानकात सुरू करण्यात आला असून, तो यशस्वी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
ट्रेनमधील तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी सीसीटीव्हींची मदत
By admin | Published: April 15, 2017 2:12 AM