मुंबई : शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. शाळांनी या कॅमेऱ्यांचे हार्डडिस्क सांभाळणे अनिवार्य आहे. तसेच, राज्यातील ६५,६८६ शासकीय शाळांपैकी केवळ १,६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. उर्वरित शाळांमध्ये ते बसविण्यासाठी यंदाच्या वर्षी प्रक्रिया सुरू केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी विधिमंडळात सांगितले.काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता. पुण्यात आठवड्यात मुलींवर बलात्काराच्या झालेल्या दोन घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. या प्रश्नाच्या चर्चेत भाजपचे जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने ७ एप्रिल २०१६ च्या परिपत्रकान्वये दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ६५,६८६ शाळांपैकी १,६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले आहेत. उर्वरित शाळांमध्ये ते वर्षभरात बसविण्याची प्रक्रिया राबविली जाईल. शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीत महिला शिक्षक, मुख्याध्यापक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश असेल. विधान परिषदेत आ. मनीषा कायंदे आणि कपिल पाटील यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.
सर्व शाळांत सीसीटीव्ही बंधनकारक; शिक्षणमंत्र्यांची विधिमंडळात भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 9:49 AM