मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्या टप्प्यांतर्गत ५७ बस स्थानक-आगारांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यापैकी पहिल्या पाच ठिकाणी ७९ सीसीटीव्ही कार्यरत झाले आहेत. यात मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला-नेहरूनगर बस स्थानकांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आणि मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज लोहिया यांनी या पाच स्थानकांची पाहणी केली.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी स्थानकांत सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती. या घोषणेला अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर आॅक्टोबर महिन्यात निविदा काढून खासगी कंपनीला सीसीटीव्हीचे कंत्राट देण्यात आले. यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात २० सीसीटीव्ही, परळ स्थानकात १४ सीसीटीव्ही आणि कुर्ला-नेहरूनगर स्थानकात १४ सीसीटीव्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुणे येथील शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकावर अनुक्रमे १३ आणि १८ सीसीटीव्ही बसविले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू आहे. याच्या यशस्वीतेनंतर उर्वरित ५२ स्थानकांवर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येतील.आगार व्यवस्थापकांवर देखरेखीची जबाबदारीया सीसीटीव्हींच्या देखरेखीची जबाबदारी आगार व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. यासाठी व्यवस्थापकांच्या कक्षात स्क्रीन लावण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याअंतर्गत पाच स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.
मुंबई, पुण्यात पाच एसटी स्थानकांवर सीसीटीव्हींचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:27 AM