ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - एखाद्या चौकात वाहतूक पोलीस नसतील तर लाल सिग्नल तोडणारे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभे करणारे किंवा फुशारकी मारत विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र अशा महाभागांची आता खैर नाही. स्मार्ट सिटीकडे पाऊल टाकत असलेल्या नागपुरात आता वाहतुकीचे नियम तोडणारे तंत्रज्ञानाच्या मदतीने कायद्याच्या सापळ्यात सापडणार आहेत. आॅरेंज सिटी चौक ते थेट जपानी गार्डन चौकापर्यंत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून वाहतूक पोलिसांचा सिग्नलवरील घडामोडींवर बारीक नजर राहणार आहे. नियम तोडणाऱ्यांच्या घरी थेट ई-चालान पोहोचविण्यात येईल.वेळोवेळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार शहरात वाहतूकदारांना शिस्त नाही, असे स्पष्ट झाले आहे. अनेकदा तर वाहतूक पोलीस असतानादेखील सर्रास नियम तोडले जातात. कुणी मोठ्या वाहनांचा आडोसा घेऊन ट्रिपल सीट निघून जातो, तर बरेच जण गर्दीचा फायदा घेऊन सिग्नल तोडून पसार होतात. या सर्व बाबी लक्षात घेता पोलीस यंत्रणा हायटेक करण्याची सुरुवात झाली. हेल्मेट न घालणाऱ्यांचे फोटो काढून ई-चालान पाठविण्यात येत होते. आता त्याहून एक पाऊल पुढे जात थेट सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच नियम तोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जर कुणी वाहतुकीचा नियम तोडला तर त्या व्यक्तीचे वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद होईल व काही वेळातच ई चालान जारी करण्यात येईल. ई चालान मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत दंड जमा करणे अपेक्षित आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना न्यायालयामार्फत समन्स पाठविण्यात येणार आह व पुढे त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.शहरात ४००० सीसीटीव्ही लागणारनागपुरात येत्या काळात ४००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यामुळे पोलीस यंत्रणेला मोठी मदत मिळणार आहे. नियम तोडणाऱ्यांवर वचक तर निर्माण होईलच, शिवाय गुन्ह्यांच्या संख्येवरदेखील नियंत्रण येणार आहे. शहरातील विविध भागात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्यावर हिट अॅन्ड रनच्या प्रकरणांतील अज्ञान आरोपीदेखील लपून राहणार नाहीत. शिवाय चेन स्नॅचिंग, छेडखानी, लाचखोरी यासारख्या प्रकरणांवरदेखील नियंत्रण येईल.श्शू...कॅमेरा तुम्हाला पाहतो आहे-सिग्नल तोडणे-वेगाने गाडी चालविणे-विनाहेल्मेट, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे-स्टॉप लाईनच्या समोर गाडी उभे करणे-अनधिकृत पार्किंग करणे-फॅन्सी किंवा नियमबाह्य नंबर प्लेट लावणे-चुकीच्या दिशेने गाडी चालविणे-नो एन्ट्रीमध्ये गाडी टाकणे