मुंबई : परवाना देतानाच कडक नियम लागू करून आणि त्याची सक्तीने अंमलबजावणी करून डान्स बार पुन्हा सुरु झालेच तरी त्यांच्या प्रथमपासूनच मुसक्या आवळण्याची तयारी मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे.बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलिसांनी मागणी केल्यास कमीत कमी ३० दिवसांचे रेकॉर्डिंग सादर करणे, सक्तीचे पार्किंग आणि बारमधून भारतीय शास्त्रीय नृत्यास परवानगी देणे आदी नियम लागू करण्याची मुंबई पोलिसांची योजना आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ६ नोव्हेंबर रोजी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. पुन्हा डान्स बार सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज आल्यास या बाबी स्पष्ट होतील. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, पुन्हा डान्स बार सुरू होणार असल्यास त्याच्यासाठी निश्चितच नियम ठरविले जातील. डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, आवश्यकता पडल्यास किमान ३० दिवसांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध करून देणे, बार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे, असे फलक लावणे आदी नियम त्यात असतील.हा अधिकारी म्हणाला की, केवळ भारतीय शास्त्रीय नृत्य करण्यासच परवानगी दिली जाईल. त्याची आम्ही सक्तीने अंमलबावणी करू.आणखी एका पोलीस उपायुक्त हुद्द्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बारमध्ये येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे सक्तीचे केले जाईल. त्यात प्रत्येक तीन टेबलमागे एका कारच्या पार्किंगची व्यवस्था आवश्यक असेल. या नियमाचीही सक्तीने अंमलबजावणी केली जाईल.
डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावले जाणार
By admin | Published: October 19, 2015 2:27 AM