- ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 2 - उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी म्हापसा गट काँग्रेसने खड्ड्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त केक कापून त्याचा वर्धानदिन साजरा केला. तसेच स्वखर्चाने शहरातील खड्डे बुजवण्यात आले.
म्हापशातील हनुमान नाट्यगृहाजवळ पडलेल्या खड्ड्यांजवळ हा कार्यक्रम गट, युवा महिला तसेच सेवा दल व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी युवा अध्यक्ष शेवियर फियेलो, गटाध्यक्ष विजय भिके, युवा गट अध्यक्ष सुदीन नाईक, महिला गट अध्यक्ष मिताली गडेकर, चंदन मांद्रेकर, विकेश असोटीकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर विकास मंत्री तसेच म्हापशाचे आमदार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या मतदारसंघात झालेल्या या रस्त्यांच्या स्थितीचा फियेलो यांनी निषेध केला. तसेच गट काँग्रेसने हाती घेतलेल्या उपक्रमाची स्तुती केली. रस्त्यांमुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे तसेच अनेक अपघात घडल्याने त्याला सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात मागील एका वर्षापासून पडलेल्या खड्ड्यांवर दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गट काँग्रेसच्या वतीने वर्धापनदिन साजरा केला असल्याचे भिके यांनी यावेळी सांगितले. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्त करणे अतीआवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मागील एका वर्षापासून खराब झालेले रस्ते पुढील दोन दिवसात तरी हे काम प्रशासनाने हाती घ्यावे किमान महत्वाच्या रस्त्यांचे काम हाती अशीही मागणी भिके यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित इतर नेत्यांनी सरकारचा तसेच पालिकेचा निषेद केला. नंतर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.