- अमृता कुलकर्णीघरात गणपती असला की घरातील वातावरण कसे मंगलमय असते; पण सार्वजनिक गणेशोत्सवात असे मंगल वातावरण खरंच असते का? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जरी लोकमान्य टिळकांनी केली असली तरी त्यातील त्यांचा मूळ उद्देश त्या काळात जसा लागू होता तसा आज आहे का? जनसंपर्काची इतर इतकी आधुनिक माध्यमे उपलब्ध असताना गणेशोत्सव हे आज काही प्रमाणात धंदा म्हणून बघण्याचे साधन झाले आहे का, याचा विचार व्हायला हवा.नवीन वर्षाचे कॅलेंडर हाती पडले की आपण गणेशचतुर्थी व दिवाळी कधी आहे ते प्रथम बघतो. श्रीगणेशाच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरू होते. दीड, पाच, सात किंवा १० दिवस अशी आपण बाप्पाची स्थापना करतो. सकाळ-संध्याकाळ आरती, मूर्तीभोवती शोभिवंत आरास आणि वर्षभरात कधीही झाले नाही तरी या दिवशी उकडीचे मोदक नक्कीच करतो. रोज दोन वेळा नैवेद्य असतो. त्याची तयारी, खिरापत, समई अखंड तेवत ठेवण्यासाठी तेलाची बाटली, कितीही महागडी असली तरी फळे, फुले अशा किती गोष्टी आपण हौसेने करतो. काही मंडळी तर गणपतीला सोन्याचे-हिऱ्याचे दागिनेही घालतात.हे सगळे झाले घरच्या मंगल वातावरणाविषयी. पण सार्वजनिक गणेशोत्सवात असे मंगल वातावरण खरेच असते का? याची सुरुवात जरी लोकमान्य टिळकांनी केली असली तरी त्यातील त्याचा मूळ उद्देश त्या काळात जेवढा लागू होता तेवढा आज आहे का? जनसंपर्काची इतर इतकी आधुनिक माध्यमे उपलब्ध असताना गणेशोत्सव हे आज काही प्रमाणात धंदा म्हणून बघण्याचे साधन झाले आहे का याचा विचार व्हायला हवा.जसजशा वस्त्या वाढल्या, नवनवीन कॉम्प्लेक्सेस उभी राहिली तसे गणेशोत्सवही वाढले. प्रत्येक गल्लीबोळात विविध गणेश मंडळांचे गणपती स्थापन होऊ लागले.गणपतीविषयी आम्हा भारतीयांच्या मनात खास भावना आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणेशवंदनाने करतो. गणपती बाप्पा हा आपल्याला ‘आपला’ वाटतो. इतर देवांविषयी थोडीशी गूढ, किंचित धाक अशी भावना असताना गणपती बाप्पाला आपल्या मनात विशेष स्थान आहे. त्यामळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ही भावना तर निश्चित दिसून येते. मुंबई-पुण्यासारख्या शहरात या उत्सवांना विशेष उधाण येतं. पण इतक्या भाऊगर्दीत, दाटीवाटीत बाप्पाची मूर्ती आणून स्थापन करण्यात तसेच तिचे व्यवस्थित विसर्जन करण्यात कोणीही कमी पडत नाही. उलट दरवर्षी यात इतर धर्मांचे व प्रांतांचे लोकही सामील होऊ लागले आहेत.इतर प्रसंगात किंवा दुसऱ्या एखाद्या सणावेळी माणसे एकमेकांकडे जातील किंवा न जातील, पण गणपतीच्या दर्शनाला नक्की जातात. त्यातसुद्धा पुण्याचा कसबा आणि मुंबईतला ‘लालबागचा राजा’ हे मानाचे गणपती मानले जातात.खरेतर काळानुसार आपणही काही बाबतीत बदल घडवून आणले पाहिजेत. उदाहरणार्थ, गणपतीच्या मूर्तीच्या उंचीबाबत काही नियम करायला हवेत. फार अवाढव्य मूर्ती रस्त्यातून मिरवत नेताना त्यांची सुरक्षा व काळजी घेण्यात आयोजकांना एक प्रकारचा तणाव पडतो. यात श्रद्धेचा भाग तर आहेत, पण जबाबदारी खूप मोठी असते. रस्त्यात कधी कधी पूल लागतात. पुलाखालून सहजगत्या जाईल, अशी आटोपशीर मूर्ती असावी. तसेही मंडळांच्या पूजेच्या लहान मूर्ती वेगळ््या असतातच, त्यामुळे सजावटीच्या या मूर्तीचा आकार बदलला तरी हरकत नसावी.शिवाय भडकणारी महागाई बघता गणेश मंडळांनी लोकांना सक्ती करू नये. ज्याची जेवढी ऐपत असेल तेवढी वर्गणी त्याने द्यावी. दुसरे असे की सजावट आणि कार्यक्रम यावर भरमसाठ खर्च करणे टाळावे, कारण देव भावाचा भुकेला असतो. त्याला या व अशा भपक्याची गरज नसते. भक्तीसाठी फक्त गणेशाची सुंदर मूर्ती व भक्ताची भक्ती एवढेच पुरेसे असते, तरी त्यात पानाफुलांची आरास करावी. जमेल तितकी हौसही करावी, पण देवाच्या मूर्तीपेक्षा जास्त डोळ््यात भरणारे देखावे उभारण्याची गरज नाही. काही गणेशमंडळे अतिशय सूज्ञपणे हा उत्सव साजरा करतात. त्यांच्या मूर्तीचा आकार मर्यादित असतो आणि सजावटीतून काही सामाजिक संदेश दिलेला असतो. अशा गोष्टी व्हायला हव्यात.
उत्सवातील मांगल्य जपावे
By admin | Published: September 13, 2015 4:59 AM