मुंबई : नागपंचमीला नागाची पूजा करायची, त्याला दूध पाजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु या पूजेसाठी जे नाग पकडले जातात त्यांचे किती हाल केले जातात; याची कल्पना आपल्याला नसते. भीती, घृणा, मृत्यू व पूजा या सर्वांची सांगड म्हणजेच साप. याच भीतीची जागा नागपूजेने घेतली. सापाची मूर्ती करून त्याची पूजा प्रचलित झाली. परंतु तोच पूजेचा साप आपला शत्रू होतो. तो दिसतो तेव्हा आपोआप आपण काठ्या, दगड घेऊन मारायला जातो. परिणामी, नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नको, असे आवाहन निसर्गमित्रांनी केले आहे.पंचमीच्या महिनाभर अगोदर नाग पकडायला सुरुवात होते. नाग पकडला की त्याचा विषदंत तोडला जातो. तर काहीवेळासुईच्या साहाय्याने नागाच्याविषग्रंथी खेचून काढल्या जातात. अशा नागांना टोपलीत बंद केलेजाते. त्या जखमी नागाचे शहरात प्रदर्शन केले जाते. तो नाग टोपलीत उपाशी, जखमी असतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची टोपली उघडली जाते, नाग मोकळ्या हवेत श्वास घेतो. याचवेळी त्याच्यासमोर हाताची हालचाल करून पुंगी वाजविली जाते. तेव्हा नाग फणा काढत हालचालीमुळे मागेपुढे डुलत असतो (नागाला कुठलाही आवाज ऐकू येत नाही). कालांतराने येथे लोक जमा होतात. भाविक नागावर गुलाल-कुंकू उधळतात. नागासमोर दूध ठेवतात. नाग दुधाला पाणी समजून पितो. दूध हे जरी सापाचे अन्न नसले तरी भुकेलेला नाग दूध किंवा सरबत ठेवला तरी पितो. दूध पिलेला नाग दूध न पचल्यामुळे चोवीस तासांत मरतो, असे निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले.
नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 5:50 AM