पुणे: यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वैश्विक आपत्तीमुळे गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र त्यासाठी निराश न होता गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा फाटा मिळाला नाहीतर, पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून पूजन करावे. कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल, असे दाते पंचागचे मोहन दाते यांनी सांगितले. गुढीपाडवा हा आनंदाचा सण... याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टींचा प्रारंभ होतो. परंतु उद्या (25 मार्च) साजरा होणा-या हा सणावर कोरोनाचा प्रभाव असणार आहे.त्यामुळे घरीच राहून साधेपणाने गुढीपूजन कसे करावे याची माहिती दाते यांनी दिली . सूर्योदयानंतर गुढी उभारावी आणि सूर्यास्तानंतर तिचे पूजन करून ती काढावी. हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे, शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजास प्रार्थना करावी. यंदाच्या नवीन वर्षाचे नाव 'शार्वरी' असे असून, यावर्षी अधिक आश्विन महिना आल्याने हे 13 महिन्यांचे वर्ष आहे. 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर असा अधिक महिना असणार आहे. त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जनानंतर 1 महिन्याने नवरात्र सुरु होईल, 14 नोव्हेंबरला एकाच दिवशी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन असून 16 नोव्हेंबरला एकाच दिवशी दिवाळी पाडवा व भाऊबीज आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.......
यंदाचा गुढी पाडवा असा साजरा करा..! पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:00 PM
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा आनंदाचा सण...
ठळक मुद्देघरीच राहून साधेपणाने गुढीपूजन कसे करावे याची दाते यांनी दिली माहिती