बी.एम.काळे-
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाचे मूळ ठिकाण असणाऱ्या कडेपठार मंदिरात गणपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा... यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली. तेव्हापासून हा शुभ दिवस 'गणपूजा' या नावाने ओळखला जातो. आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये रात्री नित्य पूजा झाल्यानंतर मानकरी व उपस्थित भाविकांनी भंडार वाहिला. अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भंडाराच्या राशी उभ्या करण्यात आल्या. सुमारे दोन टन भंडाऱ्याची रास अगदी मार्तंड भैरवाच्या गळ्यापर्यंत रचण्यात आली होती. त्याचबरोबर विविध फुलांची आकर्षक रचना करण्यात आली होती. देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना काढण्यात आला. तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये सुरू होता. वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करीत होते. छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.याप्रसंगी मंदिरामधील सर्व सजावट निलेश बारभाई, अविनाश बारभाई, अनुराज बारभाई, मंदार सातभाई, सिद्धार्थ आगलावे, शुभम मोरे, विशाल लांगी, प्रसाद सातभाई यांनी केली असून देवाचा छबिना अनिल आगलावे यांनी धरला होता व छबिण्यासमोर राजेंद्र मोरे, प्रथमेश मोरे, सुधाकर मोरे, स्वप्नील मोरे, गणेशा मोरे, समीर मोरे, ऋषिकेश मोरे, निलेश मोरे, आदींनी सनई आणि डोळ्याच्या वादनात छबिना रंगविला. हा छबिना पहाटे पाच वाजता मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर सर्व भाविक भक्तांना देवाच्या अंगावरील भंडारा वाटप करण्यात आले. दिवसभरात मानापानाच्या पूजा सर्व वाणी समाजाने करून देवाला भंडारा वाहिला. देवस्थानच्यावतीने विश्वस्त वाल्मीक लांगी, सचिव सदानंद बारभाई, व्यवस्थापक बाळासाहेब झगडे, दीपक खोमणे ,किरण शेवाळे, सचिन शेवाळे ,शंकरराव आगलावे नागनाथ बामनकर, धनंजय नाकाडे उपस्थित होते. उत्सवासाठी विशेष सहकार्य मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे, राजकुमार लोढा, कर्मचारी नितीन कुदळे, राणे,मंगेश चव्हाण, अमोल खोमणे, निलेश खोपडे ,मंगेश चव्हाण . तसेच ग्रामस्थांमधून कृष्णा कुदळे,शैलेश राऊत, प्रशांत कदम ,सुमित कुंभार, संदीप कुतवळ, मनोज मोहिते,चंदन अटक यांनी सहकार्य केले. देवस्थानच्यावतीने वाघ्या मुरळीना सन्मानपत्र देण्यात आले.तसेच सर्व भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.भंडारा वाटप झाल्यानंतर गणपूजेची सांगता झाली.