ठाणे : गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकीय अस्थिरता अखेर गुरुवारी संपुष्टात आली आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची घोषणा होताच ठाण्यातील त्यांच्या निवासस्थाबाहेर एकच जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.इतिहासात ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले. यापूर्वी जिल्ह्यात अनेक बडे नेते होऊन गेले, अनेकांनी राज्यात व केंद्रात मोठमोठी पदे भूषविली आहेत. मात्र शिंदे यांच्या रूपाने जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद मिळाल्याने शिंदे समर्थकांमध्ये वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या महिला आघाडीने शिंदे यांनी शपथ घेताच जल्लोष केला तर शहराच्या विविध भागात फटाके वाजले. शिंदे यांनी शपथ घेताच त्यांच्या निवासस्थानी एकच जल्लोष पाहायला मिळाला. लुईसवाडी येथे असलेल्या शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी फटाके फोडले, ढोल-ताशाच्या गजरात एकच आनंदोत्सव साजरा केला. शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या डोळ्यातून यावेळी आनंदाश्रू पाहायला मिळाले.
शपथविधी सोहळ्याला कुुटुंबीय हजर -एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, नातू रुद्रांश, सून वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे गोव्यात आमदारांसोबत असल्याचे सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी घटना आहे.- संभाजी शिंदे, वडीलशिवसेनेकरिता वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाचे चीज झाले. ही मनाला अत्यंत आनंद देणारी घटना आहे. - लता शिंदे, पत्नी