ठाणे : बोरीबंदर स्थानकातून १६ एप्रिल १८५३ रोजी ठाण्यासाठी धावलेल्या आशिया खंडातील पहिल्या रेल्वेच्या सुखद आठवणी जाग्या करण्यासाठी प्रवासी संघटनांनी रविवारी रेल्वेगाडीच्या आकारातील केक कापून आनंद साजरा केला. ही रेल्वे धावली कशी, तिचा प्रवास कसा झाला, तिची सुरूवातीची तिनही इंजिने यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. या पहिल्या रेल्वेसफरीला रविवारी १६३ वर्षे पूर्ण झाली; त्यानिमित्ताने केकही कापला तो गँगमनच्या हस्ते. नंतर हा केक प्रवाशांना वाटून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ठाणे रेल्वे आणि दिवा, मुंब्रा, नवी मुंबई, कोकण, कल्याण-कसारा, महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी संघांनी एकत्रत येत या घटनेचा वाढदिवस फलाट क्रमांक २ येथे साजरा केला. स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर पहिल्या रेल्वेची प्रतिकृती करून जुन्या आठवणींना उजाळाही दिला. प्रवासी तेथे जमून सेल्फी काढण्याचा आनंद लुटत होते. मोबाईलवर या क्षणाचे चित्रण करत होते.जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटच्या समयसूचकतेमुळे २४ जानेवारीला मोठा अपघात टळला होता. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्थानक प्रबंधक, बुकिंग क्लार्क व इतर रेल्वेतील कर्मचाऱ्यांचाही ठाणे रेल्वे प्रवासी संघाने गौरव केला. शनिवारी रात्री १२ नंतरही कोकण प्रवासी संघटनेने केक कापला होता. (प्रतिनिधी)
ठाण्यात साजरा झाला रेल्वेचा वाढदिवस
By admin | Published: April 17, 2017 2:23 AM