नाशिक : नाटक ही जिवंत कलाकृती आहे. केवळ संहिता पाहून सेन्सॉर बोर्डाने (रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ) एखाद्या नाटकाचे भवितव्य ठरवू नये. ‘बॉम्बे-१७’ हे नाटक रंगभूमीवर येऊच नये, अशी बोर्डातील काही लोकांची इच्छा होती, असे सांगत नाट्यनिर्मात्यांच्या ‘नसबंदी’चा पद्धतशीर प्रयत्न सेन्सॉर बोर्डातील लोकांकडून होत असल्याचा आरोप नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील वास्तव जीवनदर्शन घडविणाऱ्या ‘बॉम्बे-१७’ या नाटकाचा मुंबईबाहेर पहिला प्रयोग नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिरात झाला. त्यावेळी राहुल भंडारे यांनी नाटक आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले. भंडारे म्हणाले, हे नाटक केवळ धारावी झोपडपट्टीतील वास्तव सांगणारे नाही, तर झोपडपट्टीतील ४० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करते. नाटकातील ‘घंटा’, ‘मोरी’ यांसारख्या शब्दांवर आक्षेप घेतले गेले. मुळात हे नाटक रंगभूमीवर येऊच नये, अशीच त्यांची इच्छा होती. आता मुख्यमंत्र्यांनीच पत्र पाठवून सेन्सॉर बोर्डाला प्रयोग करू देण्याचे निर्देश दिले आहेत. मी रंगभूमीवर ‘शिवाजी अंडरग्राउंड’ सारखे नाटक आणले तेव्हाही त्याची पथनाट्य म्हणून बोळवण करण्यात आली होती.
सेन्सॉर बोर्डाकडून निर्मात्यांची ‘नसबंदी’
By admin | Published: September 22, 2014 2:18 AM