मुंबई : अनुसूचित जातीतून धर्मांतर करून बौद्ध झालेल्यांना केंद्र शासनाच्या नोकरी, शिक्षण व इतर योजना, सोयीसवलतींमध्ये अनुसूचित जातीचे सर्व लाभ मिळणार आहेत. यासंदर्भात केंद्र शासन सुधारित जात प्रमाणपत्र नमुना काढणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेल्या बौद्ध समाजाला मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी येथे दिली. बडोेले, रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले आणि राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेतली. देशातील बहुतांश राज्यांतील अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मांतरित लोकांना केंद्र व राज्य सरकारांमध्ये नोकरी, शिक्षण व आर्थिक विकास याबाबत फायदा होईल. तसेच मागील २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जातीतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांचा प्रश्न सुटेल, असे बडोले म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
धर्मांतरित बौद्ध बांधवांना मिळणार केंद्राच्या सवलती
By admin | Published: June 23, 2016 5:22 AM