ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 5 - बुंदेलखंडमध्ये ट्रेनने पाणी पाठवू नका असे उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे. राज्यामधली पाण्याची अवस्था मराठवाड्याएवढी भीषण नसल्याचे राज्य सरकारने केंद्राची ऑफर नाकारताना म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बुंदेलखंडमधल्या महोबा जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती असून रेल्वे मंत्रालयाने ट्रेनने पाणी पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता.
उत्तर प्रदेशचे महसूल विभागाचे मुख्य सचिव सुरेश चंद्रा यांनी रेल्वे प्रशासनाकडून तसा प्रस्ताव आल्याचे मान्य केले. मात्र, सध्याची उत्तर प्रदेशातली स्थिती मराठवाड्यासारखी भीषण नसल्यामुळे आत्ता तरी अशा जलएक्स्प्रेसची गरज नसल्याचे चंद्रा यांनी कळवले आहे. तसेच, जर तशीच गरज भासली तर आम्ही मागणी करू त्यावेळी पाणी द्या असेही चंद्रा यांनी रेल्वे मंत्रालयाला कळवले आहे.
बुंदेलखंडमध्ये पाण्याची समस्या आहे, परंतु आम्ही पुरेशा उपाययोजना करत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. दुष्काळी भागातल्या पंचायतींमध्ये वॉटर टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याखेरीज, या भागातले हँडपंपही व्यवस्थित काम करत आहेत, आणि आवश्यक त्या हँडपंप्सची दुरूस्तीही करण्यात येत आहे असा दावाही युपी सरकारने केला आहे.