मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच जोडीला मुलुंड, कांजूर आणि देवनार या तीन डम्पिंग ग्राउंडच्या समस्या हा या भागात प्रचाराचा प्रमुख मुद्दा घेऊन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.उत्तर पूर्व मुंबईत लोकसभा मतदारसंघांमध्ये मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द - शिवाजीनगर या विधानसभा क्षेत्रांचा सहभाग आहे. यापैकी मुलुंड पश्चिम आणि घाटकोपर पूर्वेकडील बहुतांश भाग हा गुजराती भाषिक आहे, तर मानखुर्द शिवाजीनगर येथील बहुतांशी मतदार हा अल्पसंख्याक असून उरलेला ईशान्य मुंबईचा सर्व पट्टा मध्यमवर्गीय मराठी भाषिक आहे. मुलुंडमध्ये सध्या काही प्रमाणात भाजपाचे वर्चस्व असून भांडुपमध्ये सेना आणि मनसेचे तर विक्रोळी-घाटकोपरमध्ये भाजपा, सेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.भाजपाचे तीन, सेनेचे दोन तर समाजवादी पक्षाचा एक आमदार या मतदारसंघात असून भाजपाचा खासदार आहे. काही भागांमध्ये भाजपाचे पारडे जरी जड असले, तरी अनेक विभाग सेनेचे गड म्हणून ओळखले जातात. भाजपाविरोधात सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या अंतर्गत रोषामुळे या निवडणुकांच्या निकालावर याचा परिणाम होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांंनी वर्तवला आहे. या दोघांच्या वादात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ईशान्य मुंबईतील रिपाइंचा कवाडे गट काँग्रेससोबत युती करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि रिपाइंच्या काही जागा त्या निर्णयानंतर दुभागल्या जाणार आहेत. युतीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे उमेदवारांनी पक्षांतर्गत फिल्डिंग लावली आहे. दोन्ही पक्षांतील उमेदवार वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी विविध शक्कल लढविताना दिसत आहेत. मात्र या सर्वांचे लक्ष पक्ष निर्णयाकडेच लागले आहे. ईशान्य मुंबईत सर्वाधिक महिला आरक्षण असल्याने या ठिकाणी महिलाराज दिसून येणार आहे. विक्रोळी आणि भांडुप, मुलुंड कॉलनी या परिसरात डोंगराळ भागात चाळींत राहणाऱ्या नागरिकांना आजही पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. घाटकोपर, भांडुपमधील अरुंद रस्त्यांच्या भिजत पडलेला वाहतुकीचा प्रश्न डोकेदुखी ठरत आहे. त्यात मेट्रोची भर पडल्याने या कोंडीत आणखीन भर पडली. ठिकठिकाणी असलेल्या झोपडपट्टयांच्या पुनर्विकासाचा मुद्दा प्रमुख आहे. विक्रोळी कामगार वसाहत, घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथील पुनर्विकासाचा मुद्दा या भागात महत्त्वाचा आहे. (प्रतिनिधी)।मुलुंड - सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुलुंडमध्ये गुजराती तसेच मराठी वस्ती अधिक आहे, तर भाजपाचे सरदार तारासिंग हे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भांडुप पश्चिम - शिवसेनेचे अशोक पाटील हे या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. भांडुपमध्ये कोकणी, मराठमोळी लोकवस्ती अधिक आहे. त्यामुळे शिवाजी तलावाच्या मुद्द्यावर येथील मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.विक्रोळी - आशियातील सर्वात मोठी कामगार वसाहत या विधानसभा क्षेत्रात आहे. मराठी वस्ती असलेल्या या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत कार्यरत आहेत. सेनेचा गड म्हणून त्याची ओळख आहे. कांजूर डम्पिंग ग्राउंड, पुनर्विकास हा येथील गंभीर प्रश्न आहे.घाटकोपर पश्चिम - या मतदारसंघाची आमदारकी भाजपा आमदार राम कदम यांच्याकडे आहे. गुजराती भाषिक तसेच व्यापारीवर्ग या भागात अधिक आहे. घाटकोपर पूर्व - घाटकोपर पूर्वेकडील प्रभागात रमाबाई नगर या झोपडपट्टीचा समावेश आहे. गुजराती वस्तीबरोबरच मराठीवर्ग या भागात अधिक आहे. भाजपाचे प्रकाश महेता हे सध्या आमदार म्हणून या विधानसभा क्षेत्राची धुरा सांभाळत आहेत.मानखुर्द, शिवाजीनगर - या विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्याक अधिक आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी सलग दोन वेळा या आमदारकीची धुरा सांभाळली आहे. या वेळेसही समाजवादी पक्षाचा जोर या ठिकाणी कायम आहे. वाहतूककोंडी, झोपडपट्टी, देवनार डम्पिंग ग्राउंड या येथील प्रमुख समस्या आहेत.।वाहतूककोंडीएलबीएस मार्गावरील अरुंद वाटेमुळे या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या अधिक आहे. मुलुंड ते घाटकोपर परिसर तसेच मानखुर्द शिवाजीनगर परिसरात वाहतूककोंडीच्या विळख्यामुळे नागरिकांची कोंडी होताना दिसते. तर घाटकोपरमध्ये मेट्रोमुळे यात भर पडली आहे. >पुनर्विकासाचे वारेईशान्य मुंबईत मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील गावठाण परिसर, डोंगराळ वस्ती, वनजमिनीवरील वस्तींच्या पुनर्विकासाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. त्यांचा मार्ग कधी मोकळा होणार याकडे येथील मतदार आस लावून बसले आहेत. तसेच विक्रोळी कन्नमवार नगर आणि रमाबाई झोपडपट्टीचा पुनर्विकास हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.>डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटेना...ईशान्य मुंबईत मुलुंडचे हरिओम नगर, कांजूरमार्ग आणि देवनार या तीन डम्पिंग ग्राउंडची मुख्य समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या मुद्द्यावर या मतदारसंघात निवडणुकीचा रंग चढणार आहे.
डम्पिंग आणि पुनर्विकास केंद्रस्थानी
By admin | Published: January 18, 2017 2:23 AM