ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याल दुष्काळ निवारणासाठी ३ हजार १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मंगळवारी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह व कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
मात्र सरकारच्या या निर्णयाबाबत विरोधकांनी नाराजी दर्शवली असून केंद्राने महाराष्ट्राला उशीरा व तुटपुंजी मदत जाहीर करत राज्याच्या तोडांला पानं पुसली आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यानी केली आहे. तर राज्याला देण्यात आलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज असून या निधीमुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे निवारण होऊ शकते, असा विश्वास कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ३१०० कोटींची निधी मंजुर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि राधामोहन सिंह यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत.