राळेगणसिद्धीकेंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही उडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?'', असा रोखठोक सवाल अण्णा हजारे यांनी सरकारला विचारला आहे.
"निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाही? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?", असं अण्णा हजारे म्हणाले.
कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणातील शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या सिंधु सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावालाही शेतकऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र शहा यांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर असलेल्या निरंकारी समागम मैदानावर जाण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.
लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनावेळी याच शेतकरी संघटना अण्णा हजारे यांच्यासोबत दिल्लीत आल्या होत्या. "कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी ही अमानूष वागणूक योग्य नाही. निवडणूक आली की राजकारणी लोक शेतकऱ्यांच्या दारावर जातात आणि मतं मागतात, मग शेतकऱ्यांच्या मागण्या का ऐकून घेतल्या जात नाहीत? शेतकऱ्यांवर लाठीमार केला जातो. पाण्याचे फवारे मारले जातात. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. यातून आणखी हिंसा भडकली त्याला जबाबदार कोण?'', असा सवाल उपस्थित करत हजारे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.