केंद्राने सल्ल्याऐवजी इंधनावरील दर कमी करावेत, अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:03 AM2022-04-08T06:03:34+5:302022-04-08T06:04:13+5:30
Ajit Pawar News: राज्याला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.
मुंबई - राज्य सरकारने गॅसच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु, आम्ही किमती कमी केल्या तरी पुन्हा पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढतच आहेत. सध्या त्यांचा आकडा कुठल्या कुठे जात आहे. राष्ट्रवादीसह विविध पक्ष यावरून आंदोलनही करीत आहेत. त्यामुळे राज्याला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.
अभिनेत्री आसावरी जोशी यांनी गुरुवारी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला. राज्याने नव्याने कोणतेही कर लावलेले नाहीत. उलट गॅस सिलिंडरसंदर्भात एक हजार कोटींचा कर आम्ही माफ केला. काहीजण सांगत आहेत की, राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत. असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. यासोबतच मेट्रो, एसटी संपासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसंदर्भात संसदेत विषय मांडण्याची सूचना आमच्या खासदारांना केली आहे. तसेच मेट्रो प्रशासनाशीही चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची आमची तयारी आहे. तर, एस.टी. कामगारांच्या प्रश्नावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांनीच मान्य करायचा असतो, असे पवार म्हणाले.
विकासनिधीत घट केलेली नाही
आमदारांच्या निधी प्रश्नावर बोलताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधीवाटपास मर्यादा होत्या. आहे त्या निधीतून राज्यविकासाला आपल्याला खीळ बसवू द्यायची नव्हती. मात्र आम्ही जे-जे करता येईल ते-ते केले. कुठल्याही विकासनिधीमध्ये घट केली नाही. या वर्षी आपण रस्ते व विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला. आपण राज्यामध्ये कुठलाही नवीन कर लावलेला नाही, असे ते म्हणाले.