गौरीशंकर घाळे, मुंबईराज्यात वेगाने वाढणाऱ्या औद्योगीकरणामुळे हातमाग उद्योगाला फटका बसला आहे. देशात २४ लाखांहून अधिक हातमाग विणकर असताना राज्यात त्यांची संख्या केवळ ५ हजार आहे. त्यामुळे राज्यातील हातमाग टिकाविण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी योजना आखण्यात आल्याची माहिती हातमाग विकास विभागाचे सल्लागार बिजन पॉल यांनी दिली.वांदे्र-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया सेंटर’मध्ये हातमाग उद्योगातील वस्तूंचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातील विणकर आणि कलाकारांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील पैठणीचाही त्यात समावेश आहे. हातमागासाठी केंद्र सरकारने देशभरात गटस्तरावरील नोंदणी, प्रशिक्षण आणि उत्पादनासाठी दोन कोटींचा निधी जाहीर केला असून त्यासाठी एक हजार क्लस्टर तयार करण्यात आल्याची माहिती पॉल यांनी दिली. मेक इन इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विणकाम, हातमागाची माहिती आणि महत्त्व पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कमी खर्चात एकसारखे डिझाइन असणारे कापड मोठ्या प्रमाणावर तयार करता येते. मात्र, हातमागावर एखादे कापड विणण्यासाठी अधिक कालावधी व श्रमांची आवश्यकता असते. त्यामुळे हातमागाच्या पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक कापडासाठी अधिक किंमत मोजावी लागते. ग्राहकांना दरातील ही तफावत समजावून सांगण्याचे मोठे आव्हान विभागासमोर आहे. त्याच वेळी श्रीमंत ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्नही आवश्यक असल्याचे पॉल यांनी सांगितले.
हातमागासाठी केंद्राची धडपड
By admin | Published: February 17, 2016 3:18 AM