अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला आहे. राज्य सरकारने केंद्राला विरोध करण्याचे धाडस दाखावावे, अन्यथा संघर्षाला समोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळातील पाणी वाटपाच्या सामंजस्य करारात बदल करून त्याला मूर्तरूप देण्याचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत, असा दावा विखे यांनी केला. दमणगंगा व नारपार खोऱ्यातील प्रकल्पांबाबत केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली़ या बैठकीबाबत सरकारने कमालीची गुप्तता पाळली़ राज्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्याचा निर्णय केंद्र व राज्यातील मंत्री, सचिव आणि उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाल्याचे समजते. बैठकीचे इतिवृत्त जनतेसमोर खुले करावे, त्यावर हरकती मागवाव्यात़ दोन्ही राज्यांत पूर्वी एक सामंजस्य करार झाला होता़ तो अंतिम करताना राज्याची परवानगी घ्यावी, अशी अट होती़ मात्र केंद्र सरकारने विश्वासात न घेता कराराला मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. विखे म्हणाले, मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उर्वरित पाणी गुजरात राज्यात वळविण्याचा सरकारचा डाव आहे़ केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असून, राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे़ हा करार झाला, त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते़ तेच आता देशाचे पंतप्रधान आहेत़ त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले़ परंतु विरोधाला विरोध म्हणून नाही तर जनतेच्या हितासाठी विरोध करणार आहे, असे सांगून नारायण राणे यांचे ते वैयक्तिक मत आहे, त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असा टोलाही विखे यांनी लगावला़
महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा घाट
By admin | Published: January 15, 2015 4:54 AM