ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानचा मुद्दा काढून पाकिस्तानला उचकवण्याचे काम केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्रीय धोरणामुळे तसेच इंटेलिजन्स, मिलिटरी, पोलीस या यंत्रणांमधील असमन्वयामुळेच काश्मीरमधील उरी येथे आत्मघाती हल्ला झाल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील मराठा मोर्चाचे अभिनंदन करून त्यांना आरक्षण देणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्यानंतर हा देशावरील शेवटचा हल्ला आहे, असे केंद्रातर्फे सांगितले गेले होते. यानंतर एका सैनिकांचे शिर कापून नेल्याच्या घटनेनंतर एक के बदले हम दस शिर लाऐंगे, अशीही घोषणा करण्यात आली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम असतानाही उरीतील सैन्य दलाच्या मुख्यालयावर हल्ला होतो व १७ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात, याचा अर्थ गुप्तचर यंत्रणा, सैन्यदल, पोलीस, एजन्सी यांच्यामध्ये समन्वय नाही. सद्यस्थितीत सुरू असलेली युद्धाची भाषा ही देशाला न परवडण्यासारखी आहे. १९६५, १९७१ व अगदी अलीकडेच कारगिल युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे शिंदे यांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षण देणे शक्यराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढतो आहे. मराठा समाज आरक्षणाचा मुद्दयावर एकत्र झाला ही अभिनंदनाची बाब असून, विशेष म्हणजे हे मोर्चे अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने निघत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलाबाबत बोलताना हा केंद्र सरकारचा कायदा असून त्याचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे ते म्हणाले.