उस्मानाबाद/लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ सोयाबीन, तूर, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ राज्य सरकार मदत करेलच, परंतु राज्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.
खा. पवार यांनी रविवारी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तुळजापूर व लोहारा तालुका तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी व आशिव येथील परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. शक्य तितकी व लवकर मदत देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत़ परंतु, नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता एकटे राज्य सरकार पुरणार नाही़ त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी लागणार आहे. आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन याविषयी चर्चा करु, अशी ग्वाही पवार यांनी शेतकऱ्यांना दिली.भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरु - लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त भागातही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे़ येथील शेतकºयांशी बोलताना खा़ पवार म्हणाले, १९९३च्या भूकंपात या भागातील हजारो जीव गेले हे दु:ख विसरुन आपण उभे राहिलो आहोत़ त्याचप्रमाणे याही याही संकटातून उभे राहू़ धीर धरा, मार्ग काढू.सेना आमदाराची चेन गायब - उमरगा मतदारसंघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले हेही खा. शरद पवार यांच्यासमवेत होते़ गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञाताने आ. चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली.
५० हजारांची मदत हवी : संभाजी राजे -खासदार संभाजीराजे यांनीही रविवारी तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी केली़ यावेळी त्यांनी सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.