मुंबई : मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही, केंद्रालाच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षण द्यावे किंवा ५० टक्क्यांचे अट शिथिल करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार द्यावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्ती, कोरोना संकट आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जावून भेट घेतली होती. त्यांना आपल्या राज्याच्या काही गोष्टींबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. या आपत्तीच्या वेळेला एनडीआरएफचे निकष बदलायला हवेत. मदत वाढवायला हवी, अशी विनंती केली होती. तसेच, आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली होती. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, यासाठी एम्पेरिकल डेटा मागविला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही केंद्रालाच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षण द्यावे किंवा ५० टक्क्यांचे अट शिथिल करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार द्यावे, अशी विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतची अट काढतील, असा मला विश्वास आहे.'
'१५ ऑगस्टपासून नागरिकांना करता येणार लोकल प्रवास'कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.
याचबरोबर, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचे म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
'महापूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत'मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा आहे. मी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला की काय करता येईल? आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत. आपल्याला धोकादायक वस्त्यांचं पूनर्वसन करावं लागेल. तसेच पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी दुरगामी योजना आखाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'नीरज चोप्राने देशाची मान उंचावली'नैसर्गिक आपत्ती, कोरोना संकट आणि दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. विशेषत: नीरज चोप्राचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्याने देशाची मान उंचावली आहे. त्याने सुवर्ण पदक मिळावले आहे. सगळेच खेळाडू मेहनत करत आहेत. खेळात हार-जीत होत असते. ते त्याच पद्धतीने घेतले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.