पुणे : केंद्र शासनाने लागू केलेले तीन कृषीविषयक कायदे म्हणजे अदानी-अंबानी अशा खाजगी उद्योजकांना पायघड्याच आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतमाल उत्पादकापासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच हे कायदे घातक असून, याविरोधात उद्या (८ डिसेंबर) भारत बंद आंदोलनात बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवस तरी सर्व घटकांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. ते म्हणाले, कृषी कायदे (विधेयके) यांना शेतकऱ्यांचा विरोध का आहे हे समजून घेण्याऐवजी केंद्र सरकार या विरोधातील आंदोलनाला जातीय व प्रांतीय रंग देत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने देशातील शेतकरी दिल्लीपर्यंत जाऊ शकले नाहीत, तर जे शेतकरी स्वत:च्या गाड्यांनी गेले त्याला जागोजागी अडवून दडशाहीचा वापर करून पुन्हा पाठविण्यात आले.मात्र केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्यावेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारने समजूतदारपणाची भूमिका घेतली पाहिजे. पण शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून त्यांच्यावर लाठीहल्ला करणे, महामार्ग खोदून दिल्लीच्या सीमेवर रोखणे हे सरकारचे कृत्य परिस्थिती चिघळविण्यास कारणीभूत ठरवेल असेही शेट्टी म्हणाले.
-------------------