पालघर: माजी सैनिकांना पेन्शन लागू करण्याची मागणी पूर्ण होत नसल्याने कंटाळून आत्महत्या करणाऱ्या माजी सैनिकांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीने निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.नवी दिल्ली येथे आजी व माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन लागू करण्याकरिता मागील अनेक दिवसांपासून प्रदर्शन होत आहेत. अशातच निदर्शन करीत असलेल्या निवृत्त सुभेदार रामकृष्ण गरेवल यांनी दिल्लीत आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी गेटवर अटक केली. हे निंदनीय असून देशात लोकशाही नसून हुकूमशाही येत असल्याचे व असहिष्णुता फोफावत असल्याचे हे प्रतिक आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून दिल्ली पोलिसांनी केलेल्या या अटकेचा निषेध करण्यासाठी गुरवारी पालघर जिल्हा-तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, शहर अध्यक्ष शैलेश ठाकूर, सरचिटणीस निलेश राऊत, मोईज शेख, मुस्तफा मेमन, मनोहर दांडेकर, रसिक भानुशाली आदींनी पालघर शहरात निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस कमिटीकडून केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 3:25 AM