मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशानंतर भाजपने राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे विरोधीपक्षातून उमेदवार आयात करण्याचा धोरण भाजपकडून राबवले जात आहे. नुकतेच झालेल्या मेघाभरतीच्यावेळी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी भाजपप्रवेश केला होता . तर यानंतर अजूनही मेघाभरती होणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र आता भाजपमध्ये कोणत्याही नेत्याला प्रवेश देण्याआधी हायकमांड म्हणजेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने विरोधीपक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा धडाकाच लावला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्यासह वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर ह्या चार विद्यमान आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांनतर आता पुन्हा भाजपची दुसरी जम्बो मेगाभरती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता यापुढे पक्षात प्रवेश देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घ्यावी लागणार आहे. भाजपमधील इनकमिंग बाबत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील भाजप प्रभारींना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेताना राज्यातील नेत्यांना दिल्लीतून हायकमांडची एनओसी घ्यावी लागणार आहे.
मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरून अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सक्त अशा सूचना दिल्या आहेत. यापुढे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीशिवाय इतर पक्षातील कोणत्याही नेत्याला भाजपात सामील करून घेऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच बरोबर इतर पक्षातून आतापर्यंत आयात केलेल्या कोणत्याही नेत्याला उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊ नका असे सुद्धा अमित शहा यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगला ब्रेक लागणार असल्याचे बोलले जात आहे.