मुंबई - मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. मलिक यांनी नुकताच दावा केला होता, की समीर वानखेडे दलित नसून मुस्लीम आहेत आणि त्यांनी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केले आहे. यानंतर आता थेट केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. (Ramdas Athawale came in support of sameer wankhede)
आठवले म्हणाले, "मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. ते बाबासाहेबांचे अनुयायी असून दलित आहेत, ते मुस्लीम नाहीत. समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. ज्ञानदेव यांनी मला त्यांचे सर्व कागदपत्रं दाखवले असून नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांचा जावई ड्रग्स प्रकरणात आठ महिने तुरुंगात होता. यामुळेच ते जाणीवपूर्वक, असे आरोप करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा गैरवापर करत आहेत. हे चुकीचे आहे."
एवढेच नाही, तर "मी मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी वानखेडे कुटुंबाला बदनाम करम्याचे षडयंत्र थांबवावे. रिपब्लिकन पार्टी वानखेडे यांच्या पाठिशी असून समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. याप्रकरणी माझा आणि माझ्या पक्षाचा वानखेडे कुटुंबीयांना पूर्ण पाठींबा आहे," असेही आठवले यांनी यावेळी म्हटले आहे. आज समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी आठवले यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मग मुसलमानावर आरोप का करत आहात?"मी नवाब मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणे थांबवावे. जर ते म्हणत असतील, की समीर मुस्लीम आहेत, तर मग मुसलमानावर आरोप का करत आहात." आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी समीर वानखेडे यांच्यासोबत उभी आहे. समीर यांना कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.