- प्रा. राजेंद्र चिंचोले
विद्यार्थी व पालकवर्गातील स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, मार्गदर्शन आणि संदर्भसाहित्याची स्थानिक पातळीवरील उपलब्धता, स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याच्या चढता आलेख या पार्श्वभूमीवर UPSC हे करिअरचे एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षापासूनच सूत्रबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास केल्यास यशस्वी होणे शक्य आहे. नियोजनपूर्वक, सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध अभ्यास ही, UPSC परीक्षेत यशाची गुरुकिल्ली ठरते. UPSC परीक्षेबाबत न्यूनगंड दूर करून, आपल्या सामर्थ्यासोबत मर्यादा ओळखल्या पाहिजेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना १ आॅक्टोबर १९२६ या दिवशी धोलपूर हाउस नवी दिल्ली येथे झाली. पूर्वी हा आयोग ‘लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखला जायचा. १९३५ च्या कायद्यानुसार लोकसेवा आयोग हा ‘फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन’ या नावाने ओळखत जाऊ लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या उभारणीसाठी उत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी भारत सरकारच्या अधिपत्याखाली, भारतीय संविधानाच्या कलम ३१५ अनुसार संपूर्ण देशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Comission) ची स्थापना करण्यात आली. घटनेच्या कलम ३२० अन्वये केंद्र शासनातला वेगवेगळ्या विभागातील गट-अ, गट-ब सेवांची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व १० सदस्यांची समिती असून, त्यांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. यातील काही सदस्य नागरी सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, निवृत्त अधिकारी असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग हा स्वायत्त आयोग आहे.देशाच्या विकासाच्या जडणघडणीत महत्त्वाचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असते. शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. यासाठी योग्य, सक्षम, बुद्धिमान, प्रामाणिक, निर्णयक्षम, गतिमान, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उमेदवारांचे कृषी, उद्योग, वाणिज्य, बुद्धिमत्ता, आकलन तर्कसंगती, सामाजिक, सांस्कृतिक, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, ज्ञान, चालू घडामोडींवरील ज्ञान, क्षमतार्धिष्ठीत, निर्णयक्षम, प्रशासकीय अधिकारी राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारतातील गतिमान प्रशासन हे जगातील गतिमान प्रशासनापैकी एक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी देशातील वेगवेगळ्या सेवांच्या भरतीसाठी ४२ केंद्रावरून परीक्षा घेते.