मुंबई : चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांचे मोठ्या प्रमाणात स्थानकांवर चित्रीकरण होत असून, २0१४-१५ मध्ये यातून १ कोटी २३ लाख ५ हजार ६६६ रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. यामध्ये तर बीबीसीकडून ‘मुंबई रेल्वे’ या माहितीपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, बीबीसीकडूनच ६२ लाख ८३ हजार ८१८ रुपये रेल्वेला अदा करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. बॉलीवूडकडून चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी फार पूर्वीपासून रेल्वेचा वापर केला जातो. यामध्ये तर अनेक बड्या बॅनरकडून चित्रपटांचे चित्रीकरण मागील काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर झाले आहे. बॉलीवूडबरोबरच सध्या जाहिरात कंपन्यांही स्थानकांवर चित्रीकरण करण्यात आघाडीवर आहेत. मुंबईतील या जीवनवाहिनीवर अनेकांकडून माहितीपटही बनविले जात आहेत. मध्य रेल्वे स्थानकांवर तर गेल्या काही वर्षांत या सर्वांकडून चित्रीकरणासाठी स्थानक आणि परिसर तसेच लोकलचा वापर बराच होत आहे. नवी मुंबईतील स्थानकांचा चित्रीकरणासाठी गेल्या काही वर्षांत वापर केला जात असतानाच आता अन्य स्थानकांवरही बरेच चित्रीकरण होत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे २0१४-१५ मध्ये विविध चित्रीकरणांतून १ कोटी २३ लाख ५ हजार ६६६ रुपयांची कमाई मध्य रेल्वेने केल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. डॉली की डोली, किक, बदलापूर, गुड्डू रंगिला, जिगरिया या चित्रपटांच्या चित्रीकरणाबरोबरच अॅल्पेनलिबे या गोळीच्या जाहिरातीचे चित्रीकरणही सीएसटी ते लोणावळादरम्यान एका विशेष ट्रेनमध्ये करण्यात आले. तर बीबीसीकडून मुंबई रेल्वेवर आधारित एक माहितीपट तयार केला जात असून सीएसटी, ठाणे, वडाळा, ट्रेन मॅनेजमेन्ट यंत्रणा येथे चित्रीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ६२ कोटी ८३ लाख ८१८ रुपये भाडे बीबीसीला मोजावे लागले. महत्त्वाची बाब खंडाळा-भरपूर स्थानकादरम्यान आयटॉप फिल्म प्रॉडक्शन निर्मित लायन या इंग्रजी चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चित्रीकरणातून मध्य रेल्वेला १.२३ कोटींची कमाई
By admin | Published: April 23, 2015 5:31 AM