Central Railway imposed restrictions on sale of platform tickets: मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी सकाळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. एक्स्प्रेस गाडी आल्यानंतर गाडीत बसण्यासाठी प्रवाशी धावले आणि दुर्घटना घडली. यात १० प्रवाशी जखमी झाले. या घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील सात रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म विक्री तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे टर्मिनसमध्ये वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जनरल डब्ब्यात जागा पकडण्यासाठी प्रवाशांनी एकदम गर्दी केली. त्यात अनेकजण जखमी झाले. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
वांद्रे टर्मिनसमधील घटना टाळण्यासाठी आणि रेल्वे स्थानकातील गर्दी कमी ठेवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सात स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विकले जाणार नाही.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे स्थानक, कल्याण स्थानक, पुणे स्थानक आणि नागपूर स्थानकातील प्लॅटफॉर्म विक्री तात्काळ थांबवण्यात आली आहे.
दिवाळी आणि छट पूजेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, ८ नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय मदत लागणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.