मुंबई : रेल्वे अपघातात जखमी प्रवाशाला थेट हॅलिकॉप्टरने रुग्णालयात नेता यावे, यासाठी रेल्वेच्या जागेत हेलिपॅड उभारणीसाठी रेल्वेकडून १४ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र या सेवेचा मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना विसर पडला आहे. याविषयी रेल्वेकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करूनही रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी असे काहीच नसल्याचे दाखवून दिले आहे. रेल्वे अपघातातील जखमींना ट्रॅफिक जाममधून तत्काळ रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेणे शक्य होत नाही. त्यामुळे यामध्ये जखमी प्रवाशाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वेकडून यावर कुठला तोडगा काढण्यात आला आहे, याची विचारणा उच्च न्यायालयाकडून नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. यात मुंबई आणि उपनगरांतील १४ जागा हेलिपॅडसाठी निश्चित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. यामध्ये आझाद मैदान, माटुंगा जिमखाना, भायखळा, कुर्ला रेल्वे कॉलनी ग्राउंड, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअम, कल्याण रेल्वे स्कूल, अंबरनाथ एमआयडीसी, बदलापूर , भिवपुरी रोड येथील नंदकुमार इन्स्टिट्यूट, टिटवाळा येथील गणेश मंदिर, लोणावळा, इगतपुरी रेल्वे ग्राउंड, पनवेल, वसई येथील जागेचा समावेश आहे. यातील प्रथम भायखळ्यातील रेल्वेच्या जागेवर हेलिपॅड करण्याचा निर्णय झाल्यावर त्याची पाहणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल सादर केला जाणार होता. मात्र याबाबत अद्यापही हालचाली झाल्या नसल्याचे आता समोर येत आहे. ----------याविषयी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांना विचारले असता त्यांच्याकडून अजब उत्तरे मिळाली. याविषयी बोलताना ‘न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची प्रत तुम्हीच आणून दाखवा,’ असे उत्तर ‘लोकमत’शी बोलताना दिले. प्रतिज्ञापत्र किंवा प्रत आणून दाखवल्यानंतरच आपण यावर बोलू, असे उत्तर देत बोलणे टाळले
मध्य रेल्वे व्यवस्थापकाला हेलिपॅडचा विसर
By admin | Published: July 07, 2015 3:19 AM