पनवेल : मध्य रेल्वेने पनवेल - पेण मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर दररोज सकाळ - संध्याकाळ गाडी सोडून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे चंद्रकांत मोकल व राजेंद्र गायकवाड यांनी के ली आहे.अलिबाग, नागोठणे व पेण येथून पनवेलला दररोज हजारो प्रवासी नियमित प्रवास करीत असतात. त्यांना येण्या - जाण्यासाठी एसटीनेच प्रवास करावा लागतो. मुंबई- गोवा महामार्गाची बिकट अवस्था असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. एकट्या पेणहूनच १५०० पेक्षा जास्त एसटीचे पास दिले जातात. त्याप्रमाणात एसटीच्या गाड्या मात्र पेण आगारातून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. सायंकाळी तर पनवेलला पासधारकांमुळे पुढे जाणाऱ्या प्रवाशांना गाडीत चढायला मिळत नाही. त्यामुळे पेणनंतर या गाड्या रिकाम्या जातात व पासधारकांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आगाराचे उत्पन्न कमी दिसते म्हणून एसटीने या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्या बंद झाल्यावर पासधारक प्रवाशांनी काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षे एसटीच्या रायगड विभाग नियंत्रक व पेण आगार प्रमुखांकडे मागणी करून ही पासच्या प्रमाणात गाड्या सोडत नाहीत. आता लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झाल्यावर दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग व व्यापारी यांना अवघड जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने पनवेल -पेण मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने पेणहून सकाळी ८ वाजता पनवेलसाठी व पनवेलहून पेणसाठी सायंकाळी ७ वाजता गाडी सोडण्याची मागणी होत आहे.
मध्य रेल्वेने पेण-पनवेल गाडी सुरू करावी
By admin | Published: September 20, 2016 3:11 AM