लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माटुंगा येथे डाऊन मार्गावरील लोकलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. बिघाड दुरुस्त होईपर्यंत डाऊन मार्गावरील लोकल जलद मार्गावरून सोडण्यात आल्या. मात्र या लोकल गोंधळामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘लेट’मार्क लागला. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक कोलमडण्याची गेल्या आठवड्याची परंपरा या आठवड्यातही कायम राहील, असा निराशेचा सूर प्रवाशांमध्ये होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सीएसटीएम-कल्याण ही लोकल दुपारी रवाना झाली. दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी माटुंगा स्थानकात आल्यावर या लोकलच्या युनिटमध्ये बिघाड झाला. लोकल पुढे जात नसल्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला. शिवाय एकामागोमाग एक लोकलच्या रांगा लागल्या. हा बिघाड झाल्यामुळे ट्रेनला विशेष गर्दी नव्हती; मात्र लोकलच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील डाऊन धिम्या मार्गावरील वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून आले. दुपारी २.०५ मिनिटांनी हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा रोष कमी करण्यासाठी तत्काळ भायखळा ते माटुंगा स्थानकांदरम्यानची वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळविली. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांवर बिघाडासह वाहतूक वळविण्यात आल्याची उद्घोषणा करण्यात आली. दरम्यान, या बिघाडामुळे प्रवाशांना डाऊन लोकल पकडण्यासाठी फलाटात बदल करावा लागत होता. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र संध्याकाळनंतर कोलमडलेल्या वेळापत्रकाची गाडी रुळावर आली. गाडी रुळावर येईना गेल्या आठवड्यात शुक्रवारी मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक घसरल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलसेवेसह एक्स्प्रेस ट्रेनलाही लेटमार्क लागला. तर बुधवारी मुसळधार पावसामुळे लोकल उशिराने धावत होत्या. आसनगाव येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे देखील लोकल सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या ना त्या कारणामुळे रेल्वेच्या वेळापत्रक बिघाडाची गाडी रुळावर यायला तयार नसल्याने चित्र आहे.
मध्य रेल्वेची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने
By admin | Published: July 04, 2017 5:51 AM