मुंबई : नव्या लोकलची खरेदी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विस्तार वाढवणे, रेल्वे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न, ट्रेनच्या पार्किंगसाठी जागा, नवीन मार्ग व अन्य सोयीसुविधा देतानाच उपनगरीय यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचा मेक ओव्हर करण्यात येणार आहे. यासाठी एमयूटीपी-२ अंतर्गत २0 हजार कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या नियोजनाविषयीची माहिती महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी दिली. मुंबईतील प्रेस क्लबतर्फे नॉलेज सीरीज प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या स्थितीबाबत जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी त्यांनी या आराखड्याची माहिती दिली. मुंबई उपनगरीय लोकल सेवा ही प्रवाशांची सर्वांत चांगली सेवा आहे आणि प्रवाशांना ही सेवा सोयीस्कर वाटते. मात्र होणाऱ्या अपघातांमुळे ही सेवा सध्या चर्चेत असल्याचे ते म्हणाले. परंतु वर्षभरात अपघातांचे प्रमाण फार कमी झाल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. मध्य रेल्वे मार्गावर दर दिवशी दहा लोकांचा मृत्यू होतो. प्रवाशांकडून सोयीसुविधांसाठी होत असलेली मागणी व पुरवठ्यात असलेली तफावत हेच प्रमुख कारण अपघातांसाठी ठरत आहे. रूळ ओलांडताना अपघात अधिक होतात. मागच्या वर्षी २ हजार १८७ जणांचा मृत्यू झाला होता. हाच आकडा आता १ हजार ४१४ एवढा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गर्दीच्या वेळेत तर लोकलमधून प्रवास करणेही जिकिरीचे झाले आहे. एकंदरीतच या सेवेवर प्रचंड ताण वाढत असून, हा ताण कमी करण्यासाठी २0 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. उपनगरीय ट्रेनचे नियोजन करण्यासाठी फलाटांची संख्या वाढवणे, दरी भरून काढण्याकरिता नव्या ट्रेन आणणे आणि स्थिरता आणण्यासाठी दुप्पट सेवा देण्याचे काम यातून केले जाईल. मुंबईसारख्या शहरी भागांत जागेची कमतरता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे रेल्वेचा विस्तार करतानाच ठाणे, कल्याण आणि त्यापलीकडच्या जागांचा विचार रेल्वे करीत आहे. जागांचा विकास करण्यासाठीही या निधीचा वापर केला जाईल. त्याचबरोबर नव्या लोकलही ताफ्यात येणार असल्याचे अग्रवाल म्हणाले. (प्रतिनिधी)गाड्या वक्तशीरउपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. आता यात सुधारणा झाली आहे. आमच्याकडून सातत्याने वक्तशीरपणाचा आढावा घेतला जात आहे. त्यातील त्रुटींचेही निरीक्षण केले जात असल्याचे सांगितले. एसी लोकल लवकरचएसी लोकलमध्ये सॉफ्टवेअरच्या मदतीसाठी असणारी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच लवकरच ती चाचणीसाठी तयार केली जाईल आणि या वर्षाच्या आत एसी लोकल चालवण्यासाठी सज्ज केली जाणार असल्याचे अग्रवाल म्हणाले.अपघात कमी करण्यासाठीही प्रयत्नहजारो कोटींच्या करण्यात येत असलेल्या तरतुदीत अपघात कमी करण्यासाठीचेही नियोजन आहे. पादचारी पूल, भुयारी मार्ग, सरकते जिने जास्तीतजास्त उपलब्ध केले जातील. त्याचप्रमाणे स्थानकांवर पायाभूत सुविधाही उपलब्ध केल्या जातील.
मध्य रेल्वेचा ‘मेक ओव्हर’
By admin | Published: September 30, 2016 2:42 AM