पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसांनंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायायीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते. जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
"केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागताहेत, कर नाही त्याला डर कशाला" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला आहे. "संजय माझा जीवलग मित्र आहे. न्यायदेवतेचे मी या निर्णयासाठी आभार मानतो, निकालपत्रात परखडपणे काही निरिक्षणं नोंदवली. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतं आहे. याच्या अंगावर जा म्हणताच त्याच्या अंगावर जात आहेत. जग बघतंय, देश बघतोय. खोट्या केसेसमध्ये पुन्हा संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो" असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
"कर नाही त्याला डर कशाला... नुसतं घाबरून पक्षातून पळून गेलेल्यांसाठी मोठा धडा असणार आहे. राऊत ही लांब पल्ल्याची तोफ आहे. राऊत कुटुंबाचं कौतुक करायला हवं. संजय आमच्याच कुटुंबातला... आमच्यासाठीही हा काळ खडतर होता. न घाबरता कसं लढू शकतो हो दाखवून दिलं" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे १०३ आमदार निवडून आणणार, असं निर्धार व्यक्त करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, एकच शिवसेना खरी आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना, बाकी सगळे धोत्र्याच्या बिया आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.