औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी पथकाने दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी लातूर व परभणी जिल्ह्यांत जणू उंटावरुनच पाहणी केली. एकेका गावशिवारात केवळ पाच मिनिटांत फेरफटका मारून पथकाने दुष्काळ समजून घेतला. केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंह, केंद्रीय फलोत्पादन मंडळाचे कार्यकारी संचालक एस. के. सिंह, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि जिल्ह्यातील अधिकारी पाहणीत सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यात रेणापूर तांडा येथून सकाळी ९.२० वाजता सुरू झालेला दौरा कुंभारी, खानापूर करीत ९.५२ वाजता आटोपला. रेणापूर शिवारातील विष्णूकांत रविकांत औसेकर या तरुण शेतकऱ्याने पथकासमोर व्यथा मांडली. त्यानंतर खानापूर शिवारातील विश्वजित कदम यांच्या वाळलेल्या डाळींब बागेत पथक धडकले. पथकाने केवळ तासाभरात जिल्हा दौरा आटोपला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारात सकाळी ११ वाजता पथक दाखल झाले. अवघ्या पाच मिनिटांत पाहणी आटोपून पथकाने रूमणा शिवार गाठले. तेथे समस्या ऐकल्यानंतर पथकाने चार कि.मी. अंतरावरील दैठणा गाठले. सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसराला भेट देऊन पथकाने मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी पूर्ण केली. (प्रतिनिधी)गोडधोड जेवणदुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या दुपारच्या जेवणात चक्क आवडीनुसार शाकाहारी व मांसाहारी असा बेत होता. तोंड गोड करण्यासाठी गुलाब जामूनही होते. पाच-पाच मिनिटांत शिवाराची पाहणी करणाऱ्या पथकाने जेवणासाठी मात्र तब्बल ४० मिनिटांचा ब्रेक घेतला.
केंद्रीय पथकाची मराठवाड्यात उंटावरुन पाहणी
By admin | Published: August 13, 2015 2:35 AM