मुंबई: आता कोरोनाचा अहवाल अतिशय जलदगतीनं मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही याची मागणी लवकर मिळेल आणि त्यादृष्टीनं तिच्यावर उपचार सुरू करणं शक्य होईल. केंद्र सरकारनं कोरोनाच्या रॅपिड टेस्टला परवानगी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. रॅपिड टेस्टमधून अवघ्या ५ मिनिटांत संबंधित कोरोनाचा अहवाल मिळेल. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता रॅपिड टेस्ट अतिशय फायदेशीर ठरणार आहे.केंद्रानं कोरोनाच्या रॅपिड टेस्टला परवानगी दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी या चाचणीचं स्वरुपदेखील समजावून सांगितलं. 'केंद्रानं रॅपिड टेस्टला मंजुरी दिली आहे. यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल अवघ्या ५ मिनिटांत समजेल. ही चाचणी ब्लड टेस्टसारखीच असेल. व्यक्तीच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या आहेत का याची माहिती या चाचणीतून मिळेल. त्यावरुन संबंधित व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही, हे समजेल,' असं टोपे म्हणाले.गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढल्यानं राज्य सरकारनं आता महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील दिवसांत काही विशिष्ट भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं या भागात पूर्ण जमावबंदीचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉटवर लवकरच पूर्ण जमावबंदी लागू होऊ शकते.गेल्या काही दिवसांत कोरोबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचं निदान होत असल्यानं लागण झालेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्याचं काम सुरू आहे. एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर्सचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे, असं टोपेंनी सांगितलं.
CoronaVirus: आता कोरोनाचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांत समजणार; रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:42 PM