सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:49 AM2021-10-17T06:49:10+5:302021-10-17T06:52:23+5:30
आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.
पिंपरी (पुणे) : ईडी, सीबीआय, नार्कोटिक, प्राप्तिकर या सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करीत आहे. कितीही छापे मारा, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यत्किंचितही हलणार नाही. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. उलट जनतेचा विश्वास जिंकून पुन्हा हेच सरकार येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या छापेमारीवर जोरदार टीका करून पवार म्हणाले की, ज्या राज्यात भाजप विचारांचे सरकार नाही, तेथील राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. भाजपचे एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले, की यंत्रणेकडून लगेच कारवाई सुरू होते. यावरून जनतेने काय समजायचे? खासदार भावना गवळी, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विराेधात सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन, चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे. हे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.
आरोप करणारे पोलीस आयुक्त बेपत्ता
पवार म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलीस आयुक्त गायब आहेत. देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, आरोप करणाऱ्या पोलीस आयुक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. ते कुठे आहेत कोणालाही माहीत नाही. त्यांना शोधण्यात तपास यंत्रणा पुढाकार घेत नाहीत.
सूडबुद्धीने कारवाया
‘मी पुन्हा येणारच...’ असे छातीठोकपणे सांगणारे, ते काही आले नाही. म्हणून राजकीय आकसाने, सूडबुद्धीने महाविकास आघाडीच्या मंत्री, नेते यांच्या चौकशी सुरू आहेत. सत्ता नसल्याने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच ते काहीही टिप्पणी करू लागले आहेत. सत्ता नसल्याचे हे दु:ख असल्याचा टोला पवारांनी फडणवीस यांना हाणला.
‘पाहुण्यांना’ वरूनच आदेश
पवार म्हणाले, ‘अजित पवार यांच्या भगिनींच्या घरी जाऊन प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात आहे, पण त्यात काही निष्पन्न होणार नाही, पण पंधरा ते वीस लोक पाच दिवस छापे मारतात. त्यांचे काम संपल्यानंतरही त्यांना थांबविले जाते. चौकशी झाल्यावर पाहुणे परत जाणे आवश्यक होते. पाहुणा जेव्हा जात नाही तेव्हा त्यांची हकालपट्टी करावी लागते. मात्र, पाहुण्याची काही चुकी नव्हती. कारण त्यांना वरून तसे आदेश दिले होते.’
उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, हा माझा आग्रह
दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापना करताना महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन-तीन नावे होती. तीन पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वत: वर केला व हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले.
सुरुवातीला उध्दव नेतृत्व करण्यास तयार नव्हते; पण...
शिवसेनाप्रमुखांच्या चिरंजीवाने मुख्यमंत्री व्हावे, असा माझा आग्रह होता, त्यामुळेच सक्तीने त्यांचा हात वर केला. ही वस्तुस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी अनाठायी आरोप करणे योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.