पुणे : राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे मत खासदार छ. संभाजीराजे यांनी व्यक्त केले. राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे. मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकेल असे ते म्हणाले. =====पंचनामे कशाचे करणार?शेतातली उभी पिके आणि मातीही वाहून गेली आहे. मग, जागेवर जाऊन पंचनामे तरी कशाचे करणार आहात? असा प्रश्न विमा कंपन्यांना त्यांनी केला. विमा कंपन्यांनी जाचक अटी व नियम शिथिल कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. =====खासदार म्हणून नव्हे तर शिवरायांचा वंशज म्हणून मागणी करतोय मी मोठा कृषीतज्ज्ञ नाही याची मला कल्पना आहे. मी कोणावर टीकाही करणार नाही. खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महारांचा वंशज म्हणून शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली आहे. शिवरायांनी शेतीवर आलेल्या संकटावेळीही कर्जाचा विचार केलेला नव्हता. त्याचे दाखले इतिहासात आहेत. त्यामुळे या सरकारनेही कर्जाचा विचार करु नये. शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे. - छ. संभाजीराजे, खासदार