मुंबई : आता वाट बघू नका, स्वस्थ तर बसूच नका. मेक इन इंडियाचा सर्वांत मोठा बँ्रड आपली प्रतीक्षा करीत आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशविदेशातील गुंतवणूकदारांना कळकळीचे आवाहन करीत, मेक इन इंडिया सप्ताहाचे एका शानदार समारंभात उद्घाटन केले. हे शतक आशियाचे आणि त्यातही भारताचे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये आयोजित या समारंभाला स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पॅट्री सिपिला उपस्थित होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुणे होते. मेक इन इंडिया हा भारताचा आजवरचा सर्वांत मोठा ब्रँड असल्याचे सांगून उपस्थित देशविदेशातील हजारो गुंतवणूकदारांना साद घालत मोदी म्हणाले की, आम्हाला आमचा देश जागतिक उत्पादनाचे हब बनवायचा आहे. त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावले पुढे येऊ. देशाची थेट परकीय गुंतवणूक गेल्या १८ महिन्यांमध्ये तब्बल ४८ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या झळा बसत असताना आमचा विकासाचा दर वाढता आहे. देशाने केलेल्या विकासाच्या निर्धाराचे हे फलित आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारताची ६५ टक्के लोकसंख्या ही पस्तिशीच्या आतील आहे, ही युवाऊर्जाच देशाची मोठी शक्ती आहे. या युवकांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी, सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि देशाच्या सर्वंकष विकासासाठीच मेक इन इंडियाची ही संकल्पना आहे. येथील तरुणांवर नोकरी शोधण्याची पाळी न येता ते नोकऱ्या देणारे बनावेत,हा आमचा प्रयत्न असेल. देशात आज गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी आहे. या पार्श्वभूमीवर, उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. डेमॉक्रसी (लोकशाही), डेमोग्राफी (लोकसंख्या) आणि डिमांड (मागणी) या तीन ’डीं’चे भारताला वरदान आहे. त्याला चवथे ‘डी’ डीरेग्युलेशनची (लालफितशाहीच्या बंधनांमधून मुक्तता) जोड आम्ही दिली आहे. येथील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. तसेच उद्योगांसाठी करप्रणाली सुलभ आणि पारदर्शक केली जाईल. परवान्यांची संख्या कमी करणे, पर्यावरणविषयक मंजुऱ्या तातडीने देण्यावर भर दिला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पॅट्री सिपिला, मुख्यमंत्री फडणवीस, अमेरिकेतील सिस्को सिस्टिमचे कार्यकारी अध्यक्ष जॉन चेम्बर्स, कॉन्फिडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिजचे अध्यक्ष सुमित मजुमदार आदींची यावेळी भाषणे झाली. देशविदेशातील अनेक नामवंत उद्योगपतींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. (विशेष प्रतिनिधी)गांधी-आंबेडकरांचा मार्गराष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनाचा संदर्भ देत त्याची सांगड मोदी यांनी मेक इन इंडियाशी घातली. अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांना उद्योजक बनविण्यावर आणि शेतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याचा विचार या दोन महान नेत्यांनी बोलून दाखविला होता; आणि मेक इन इंडियाचे तेही एक मुख्य सूत्र आहे, असे मोदी म्हणाले. टाइम इंडिया अवॉर्ड्सभारतातील उत्पादन क्षेत्रासाठी ‘टाइम’ने सुरू केलेल्या टाइम इंडिया अवॉर्ड्सचे वितरण या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. टाटा स्टीलचा पुरस्कार टी.बी. नरेंद्रन, हीरो मोटोकॉर्पचा पुरस्कार पवन मुंजाळ तर अजंता फार्माचा पुरस्कार योगेश आणि राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला. आधी चीन, नंतर भारतस्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच, ‘जगाची नजर आज चीनवर आहे,’ असा उल्लेख केला. त्यांना भारतावर नजर आहे असे म्हणायचे होते. पण लगेचच सॉरी म्हणत त्यांनी, आधी जगाची नजर चीनवर होती; आता ती भारतावर आहे, अशी दुरुस्ती केली.
हे शतक भारताचेच : मोदी
By admin | Published: February 14, 2016 4:03 AM