मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप पावसाने म्हणावी तशी बॅटिंग सुरू केली नसली, तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी तो धो धो कोसळत आहे. आता राज्यात चालू महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस पडेल, अशी आहे.
राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
पावसाचा रागरंग पावसाने देश व्यापला आहे. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आहे.
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जुलैमध्ये सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल. राज्यात दुपारी ३ दरम्यानचे कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल. दिवसाचे तापमान जास्त म्हणून आर्द्रताही अधिक. परिणामी, पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक.