ऑनलाइन टीम
पुणे, दि. ११ - परस्परांशी मराठीत बोलणा-या विद्यार्थ्यांना काठीने झोडून काढणा-या प्रियदर्शनी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बाल अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी दिघी रोड येथील प्रियदर्शनी इंग्रजी माध्यम शाळेत आठव्या इयत्तेत शिकणा-या तब्बल २९ विद्यार्थ्यांना सिंह यांनी मारहाण केली होती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की ते सर्वजण एकमेकांशी मराठीत बोलत होते.
शाळेच्या वेळेत सर्व मुलांनी इंग्रजीतच संभाषण करावे अशी सक्ती शाळेत आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात एका मुलाची (लँग्वेज मॉनिटर) नियुक्ती केली आहे. दर आठवडय़ाला ही नोंदवही संस्थाचालक जितेंद्र सिंग पाहतात.बुधवारी त्यांनी ही वही पाहिल्यावर आठवीतल्या मुलांना कार्यालयात बोलावले व प्रत्येकाला काठीने झोडपून काढले होते. मारामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शरीरावर काळेनिळे वळ उठले होते. विद्यार्थी घरी परतल्यावर पालकांना मारहाणीचा प्रकार समजला. सर्वजण शाळेत गेले; परंतु, सुरक्षारक्षकाने अगोदरच मुख्य प्रवेशद्वार बंद करून प्रवेशास मनाई केली. तसेच सिंग यांच्याविषयी अधिक माहिती देण्यासही नकार दिला. यानंतर सर्व पालक पुन्हा एकत्र आले. काहींनी मुलांसाठी काम करणा:या ‘चाइल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला.