मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर निवडणुकीच्या निकालानंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करावे लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी पत्र परिषदेत सांगितले की, उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु ते नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. ही यादी महापालिकेसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदेसाठी निवडणूक विभागनिहाय व पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. त्यावर १२ ते १७ जानेवारीपर्यंत हरकती दाखल करता येतील. त्यानंतर २१ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध होईल. संगणकीय प्रणालीया निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी संकेतस्थळ तयार केले आहे. अर्ज सादर करण्यास सुरूवात झाल्यानंतनर संगणकीय प्रणालीद्वारे कुठल्याही वेळेस संगणकावर नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरता येतील. त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून ते विहीत वेळेतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे.उमेदवारांना शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाही. नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज संगणकाद्वारे सादर करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांना नामनिर्देशनत्रे व शपथपत्रे भरण्यास अडचण उद्भवू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक किंवा त्यापेक्षा जास्त मदत कक्षाची स्थापना करावी; तसेच सायबर कॅफे व कम्युनिटी फॅसिलिटेशन सेंटरची मदत घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
सहा महिन्यांत द्यावे लागेल जात प्रमाणपत्र
By admin | Published: January 12, 2017 5:20 AM