उल्हासनगर : इमारतीचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले. मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून स्थैर्यता प्रमाणपत्र घेऊन महापालिकेला सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन, नागरिकांना इमारती खाली करण्याचे आवाहन करते. तसेच इमारत पडून जीवित व वित्तहानी झाल्यास नागरिकांना जबाबदार धरले. दरम्यान गेल्या १५ दिवसात मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याने, सर्वस्तरातून महापालिकेच्या कारभारावर टीका झाली. अखेर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना २९ मे रोजी जाहीर आवाहन केले. धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करून तसेच इमारतीची दुरुस्ती करून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान ऐन कोरोना महामारीत कोणत्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून धोकादायक इमारतीची तपासणी करावी?, असा प्रश्न व संभ्रम नागरिकांना पडला. महापालिकेनेच एखाद्या मान्यताप्राप्त सरंचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती करून धोकादायक इमारतीची तपासणी करून तसेच दुरुस्ती सूचवून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला परस्पर सादर करण्याची मागणी होत आहे. मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याने, शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. धोकादायक इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मंजूर करून त्यांची पुनर्बांधणी करावी अशा मागणीने जोर धरला असून यातून हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका व राज्य शासनाने दुसरी घटना घडण्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याची मागणीही होत आहे.
धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण, समिती स्थापन रेतीवर बंदी असतांना शहरात सन १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेतीतून अनेक इमारतीचे बांधकाम झाले. त्याच दरम्यान अवैध इमारतीचे तोडण्यात आलेल्या स्लॅबची दुरुस्ती करून प्लॉटची विक्री झाली. अशाच इमारतीचे स्लॅब पडण्याच्या दुर्घटना होऊन अनेकांचे बळी जात आहेत. अखेर आयुक्तांनी अशा इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समिती निहाय्य समिती स्थापन केली.